सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.  ६०-७० वर्षांपूर्वी जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक घटक मिळायचे. शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी माणसे १०० ते १२५ वर्षे जगत होती, पण आता माणसांचे आयुष्यमान १०० वरून ६०-७० वर आले आहे. हे दुष्परिणाम कशाचे आहेत? तेव्हा बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता,  पूर्ण शेणखतावरच केली.  तशी आता आपण करत नाही.

दुष्परिणाम रसायनांचे

शेतात रसायनां सर्वात आधी माती खराब होते. मातीतील पोषक घटक, जीव-जंतू नष्ट होतात व ती क्षारपाड, कडक, नापीक होण्याच्या मार्गावर जाते. तीच रसायने पाण्यात मिश्रीत होतात. त्यामुळे पाणी खराब होते, पाऊस पडल्यानंतर शेतात जी रसायने वापरली आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन विहीर, ओढे, नाले, नदी, धरण या पाण्यात मिसळते. पेयजलावाटे ही रसायने पशू, पक्ष्यांसह आपल्याही शरीरात जातात. आहारातून मानवाच्या शरीरास पोषक घटक मिळत नाहीत. रसायनयुक्त आहार, पाणी, हवा यामुळे आज वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आईच्या दुधातसुद्धा विषारी कीटकनाशकाचा अंश आढळत आहे. लहानपणापासून जर हे विष मुलांच्या शरीरात गेले तर पुढची पिढी निरोगी घडेल का?

शेतकरी मित्रांनो, कमी खर्चात शेती व उत्पादनात वाढ होण्यासाठी या रसायनांचा वापर कमी करून जैविक, सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे. आपण विचार करायला हवा, आज शेतीचा खर्च खूप, त्यामानाने उत्पादन नाही, भाव मिळत नाही. जैविक शेती केली तर शेतीचा खर्च कमी होईल. माती चांगली राहील व उत्पादनातसुद्धा वाढ होईल. सकस पौष्टिक अन्न खायला मिळेल ते बाजारात चांगल्या दराने विकता येईल. शेतमालाला चव व गुणवत्ता चांगली असल्यामुळे भावसुद्धा चांगला मिळेल. आज एक वर्ग असा आहे जो जैविक शेतीतून आलेला भाजीपाला, धान्ये, फळे हे घेण्यास तिप्पट पट पैसे मोजतात. कारण त्यांना माहीत आहे, विषयुक्त आहार खाऊन नंतर औषधांना पैसे मोजण्यापेक्षा विषमुक्त आहार घेतल्यास आपलेच पैसे वाचतील. आजार झाल्यानंतर किती खर्च होईल माहीत नाही. यासाठी भविष्यात वेगळ्या बाजारपेठा निर्माण होतील जिथे फक्त (विषमुक्त) धान्ये, फळे, भाजीपाला मिळेल. यामुळे आपलीच आर्थिक प्रगती होईल. . भारतातील पहिले जैविक शेती करणारे राज्य (सिक्कीम). या राज्यातील शेतकरी केमिकल्स वापरत नाहीत. ही परिस्थिती भारतात सगळीकडे नक्की येईल

सध्याचा जागरुक ग्राहक उत्पादनाच्या दर्जाबाबत तडजोड करत नाही. अन्नधान्य व फळांबाबत तर ग्राहक जास्त गंभीर असतो. प्रत्येक बाबी तपासून उत्पादनाची निवड करतो. गेल्या काही काळात अन्नधान्य व फळांवर खते व रसायनांचा अतिरिक्त वापर करण्यात येत होता. त्याचे दुष्परिणाम शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने या गोष्टींचा अभ्यास केला. पर्यावरणपूरक उत्पादने सध्या काळाची गरज बनली आहेत. ग्राहक सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत मालाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेती करून शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. सेंद्रीय उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत तसेच देशात इतरत्र चांगली मागणी आहे. सेंद्रीय शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते  शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी. गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.

सेंद्रिय खतामुळे होणारे फायदे

सेंद्रिय खत टाकल्यास जमिनीस नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. (एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.

कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.